‘‘आर्थिक सामर्थ्य, तंत्रज्ञान कौशल्य, सक्षम स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम स्थितीत आहे. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर एआय क्षेत्रात नेतृत्व करेल,’’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे आयोजित ‘मुंबई टेक वीक २०२६’चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २९) झाले. या वेळी झालेल्या संवाद सत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे,मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, तसेच उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, की राज्य शासनाने एआय क्षेत्रासाठी १० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे, दीड लाख रोजगारनिर्मितीचे, सहा ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारण्याचे आणि विशेष ‘एआय इनोव्हेशन झोन’ विकसित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
‘महा-विस्तार’चा विशेष उल्लेख
शासनाच्या विविध विभागांमध्ये ‘एआय’चा वाढता वापर होत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘महा-विस्तार’ या शेतकरी ॲपचा विशेष उल्लेख केला. शेतकऱ्यांसाठी हे एक ‘वन स्टॉप सोल्यूशन’ असून, भारत एआय परिषदेत त्याला देशातील सर्वोत्तम शेतकरी उपाय म्हणून गौरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याच धर्तीवर ‘इंडिया-विस्तार’ संकल्पना विकसित केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
https://agrowon.esakal.com/agro-special/maharashtra-global-leadership-ai-sector-fadnavis-rat16