पश्चिम आशियातील संकट, वाढती महागाई आणि मॉन्सूनवर ‘एल निनो’चे सावट आदी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपोदरात कोणताही बदल न करता तो ५.२५ टक्के इतका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी (ता. ५) जाहीर केले. या निर्णयामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जाचा हप्ता वाढणार नसून तो स्थिर राहणार आहे.

आरबीआयने २०२५ वर्षात पॉलिसी रेपोदरात एकूण १२५ बेसिस पॉइंट्सची कपात केली होती. त्यानंतर सलग तिसऱ्यांदा रेपो दर ‘जैसे थे’ ठेवला आहे. शेती क्षेत्र आणि महागाई या बाबतही ‘आरबीआय’ने त्यांचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदाच्या मॉन्सूनची कामगिरी ही भारताचे शेती क्षेत्र आणि महागाईचा कल कसा राहील, या दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. कमी पावसाचा शेती उत्पादन आणि अन्नधान्याच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ‘पतधोरण समिती’च्या निर्णयाची माहिती देताना व्यक्त केली.

महागाई दर आरबीआयच्या लक्ष्यापेक्षा कमी असतानाही, अन्नधान्य महागाईचा पुढील कल अनिश्चित स्वरूपाचा राहील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. आरबीआयने आर्थिक वर्षातील उर्वरित कालावधीसाठी महागाईचा दर ५.१ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मॉन्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आणि ‘एल निनो’ची शक्यता आदींमुळे अनिश्चितता निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/rbi-keeps-repo-rate-unchanged-at-5-25-percent-rat16

माहिती शेअर करा