मागील काही वर्षांपासून पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तीनही ऋतूंमध्ये प्रचंड बदल झालेला आहे. पावसाळा कधी लवकर तर कधी उशिराने सुरू होणे, त्यात कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी, कमी वेळात अधिक पाऊस, दोन पावसांत मोठे खंड पडताहेत. हिवाळा हा ऋतू तर जवळपास गायबच झाल्यात जमा आहे. उशिराने म्हणजे जानेवारी शेवटी किंवा फेब्रुवारीमध्ये थोड्या कालावधीसाठी तीव्र थंडीच्या लाटा येताहेत.
उन्हाळ्यात चढत असलेला तापमानाचा पारा पिके-मानवाबरोबर संपूर्ण जीवसृष्टीला असह्य होत आहे. एकंदरीत काय तर हवामान बदलाचा हा काळ असून, त्यात नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. त्याचा सर्वाधिक फटका हा शेती क्षेत्राला बसत आहे. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या ऋतूंवर आधारीत आपल्या राज्यात, देशात बसलेली शेतीची घडी हवामान बदलाच्या काळात विस्कळीत झाली आहे. त्यामुळे हवामान अनुकूल शेती हीच राष्ट्रीय प्राथमिकता असायला हवी, असा इशारा ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया फार्मर्स असोसिएशन’ने (फायफा) प्रकाशित केलेल्या अहवालात दिला आहे.
https://agrowon.esakal.com/sampadkiya/climate-change-farming-adaptation-maharashtra-rat16