प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी ३० जूनपूर्वी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विहित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभार्थी आगामी हप्त्यांपासून वंचित राहू शकतात, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
केंद्र शासनाच्या पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्याच धर्तीवर राज्य शासनाकडूनही स्वतंत्र लाभ दिला जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नुकत्याच वितरित करण्यात आलेल्या २२ व्या हप्त्यानुसार ५ लाख ६९ हजार ४७९ शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत. यापैकी अद्याप ९ हजार ३९३ शेतकऱ्यांचे वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण झालेले नाही.
योजनेतील पारदर्शकता वाढवणे, संभाव्य गळती रोखणे आणि केवळ पात्र व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच लाभ पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार २० मे २०२६ पासून राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा फेस ऑथेंटिकेशन (चेहरा ओळख) या दोन सोप्या पद्धती उपलब्ध आहेत. वृद्ध, आजारी किंवा हालचालींमध्ये अडचण असलेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे. ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी पूर्ण करून देणार आहेत.
https://agrowon.esakal.com/agro-special/pm-kisan-ekyc-deadline-installment-blocked-june-30-abhi47