शेतकऱ्यांना ५० पैसे किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली आहे. यामुळे राज्यभरातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कांदा खरेदी प्रश्नी बुधवारी (दि. २७ मे) दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्र सरकारने केलेल्या महत्त्वाचा मागण्या मान्य करण्यात आल्या.

त्यात महत्त्वाचा म्हणजे नाफेड आणि ‘एनसीसीएफ’ यांच्याकडून कांदा खरेदी ही बाजारातून झाली पाहिजे. ही खरेदी व्यापाऱ्यांकडून नाही तर शेतकऱ्यांकडून केली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर सहमती दर्शवण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. ती घालण्यात येणार नाही. कुठल्याही निर्यातीवर सरचार्ज लावण्यात येणार नाही, असेही आश्वासन देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ उपस्थित होते. कांद्याची दोन लाख टनांऐवजी दहा लाख टन खरेदी नाफेड आणि ‘एनसीसीएफ’ने करावी. त्यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे फडणवीस म्हणाले.

https://agrowon.esakal.com/agro-special/fuel-fertilizer-forex-alert-nirmala-sitharaman-rat16

माहिती शेअर करा