मॉन्सूनचे अद्याप आगमन झाले नसल्याने खरिपाच्या पेरण्या जवळपास ठप्प झाल्या आहेत. गतवर्षी याच कालावधीत सुमारे २२ हजार १४१ हेक्टरवर म्हणजे जवळपास १५ टक्के पेरणी पूर्ण झाली होती. मात्र यंदा पावसाअभावी जिल्ह्यात पेरणी सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले असून, खरिपाची सुरुवातच खोळंबली आहे.
गतवर्षी मे महिन्यातच दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे शेतकऱ्यांना पेरण्या करण्यासाठी देखील वाफसा मिळत नव्हता. गेल्या वर्षी अतिपावसाचा पेरण्यांना अडथळा होता, तर या वर्षी पाऊसच नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. परिणामी खरीप हंगामातील भात, सोयाबीन, मका, बाजरी, मूग, उडीद, तूर, भुईमूग आणि नाचणी या प्रमुख पिकांचे क्षेत्र घटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी यंदा सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. भाताचे सुमारे ६० हजार हेक्टर, सोयाबीनचे ४७ हजार हेक्टर, मक्याचे ४२ हजार हेक्टर आणि बाजरीचे ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.सध्या शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता पुरेशा पावसाची प्रतीक्षा करावी. किमान १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण होतो, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी सांगितले.