विदर्भातील वाढत्या उष्णतेचा सकारात्मक उपयोग करत बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ) सौरऊर्जेकडे वळल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या सात सौरऊर्जा प्रकल्पांमधून वीज निर्मिती सुरू झाली असून संबंधित कंपन्यांच्या वीजबिलात लक्षणीय बचत होत आहे.
विदर्भात उन्हाळ्यात तापमान नियमितपणे ४० अंश सेल्सिअसच्या पुढे, तर मे महिन्यात अनेकदा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. या प्रखर सूर्यप्रकाशाचा उपयोग करून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या उद्योगांसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे.
ही ‘स्मार्ट’अंतर्गत राबविण्यात येत असून शेतकरी कंपन्यांच्या उद्योगस्थळी सौरऊर्जा घटक मंजूर करण्यात आले आहेत. जागतिक बँकेच्या सामाजिक व पर्यावरणीय निकषांचे पालन करत जिल्ह्यातील १६ शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अतिरिक्त जमीन न वापरता कंपन्यांच्या गोदामांच्या छतांवर सौरपॅनेल बसविण्यात आले आहेत. त्यामुळे उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर होत असून शाश्वत ऊर्जानिर्मितीला चालना मिळत आहे.