केरळच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. नागरिकांना मदत छावण्यांमध्ये आणि सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक जिल्ह्यांमधील नद्यांच्या पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पाऊस सुरू असल्याने, वायनाडच्या सुलतान बाथेरी येथील पुझमकुनी गावातील अनेक आदिवासी कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले, असे जिल्हा अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले. बाथेरीमध्ये मदत छावण्या उघडण्यात आल्या आहेत आणि एनडीआरएफ टीम जिल्ह्यात तळ ठोकून आहे, असेही त्यांनी सांगितले. जोरदार वारे आणि संततधार पावसामुळे पलक्कड जिल्ह्यातील उंच पर्वतरांगांमध्ये, ज्यामध्ये अट्टप्पाडी आणि नेल्लियमपथी भागांचा समावेश आहे, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कोझिकोड जिल्ह्यातील अनेक लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. कोझिकोड जिल्हा अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. केरळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (केएसडीएमए) कोरापुझा (कोझिकोड), मनिमाला नदी (पठाणमथिट्टा), वामनपुरम (तिरुवनंतपुरम) आणि कबानी नदी (वायनाड) या किनाऱ्यांवर राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/heavy-rains-continue-to-wreak-havoc-in-kerala-rat16

माहिती शेअर करा