खरीप हंगाम २०२६-२७ साठी सोलापूर जिल्ह्यात सुधारित पंतप्रधान पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. या विम्या नुसार चालू वर्षात अधिसूचित महसूल मंडळामध्ये अधिसूचित पिकाचे सरासरी उत्पादन जर उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आले, तर शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाई मिळणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत आहे
पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकरी हिस्सा (प्रति हेक्टर)योजनेंतर्गत विविध पिकांसाठी निश्चित केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी बाजरी, मका, सोयाबीन, मूग, तूर, उडीद, भुईमूग आणि कांदा ही पिके अधिसूचित केली आहेत. या पिकांचा विमा शेतकऱ्यांना उतरता येईल. यासाठी अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे अत्यंत बंधनकारक आहे.
जमिनीचा चालू ७/१२, ८-अ उतारा आणि पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न असलेले बँक खाते, डिजिटल क्रॉप सर्व्हे करणे बंधनकारक आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हेमधील पीक आणि विम्याच्या अर्जात नमूद केलेले पीक यात तफावत आढळल्यास, डिजिटल क्रॉप सर्व्हेमधील नोंदच अंतिम मानली जाईल आणि विम्याचा अर्ज रद्द होऊ शकतो. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे किमान ०.१० हेक्टर क्षेत्र अधिसूचित पिकाखाली असणे आवश्यक आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/kharif-crop-insurance-scheme-open-until-july-31