कृषी विभागाच्या खरीप हंगामातील कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत तूर आणि मूग पिकांसाठी १०० टक्के अनुदानावर मिनीकीट वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत ०.२० हेक्टर क्षेत्रासाठी प्रत्येकी ४ किलो बियाण्यांचे मिनीकीट वितरित करण्यात येणार असून लाभार्थ्यांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाणार आहे.

पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी एकूण १४ हजार ३०० मिनीकीट वितरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत या योजनेसाठी ५ हजार ६८३ अर्ज प्राप्त झाले आहेत.जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यासाठी १ हजार मिनीकीटचे उद्दिष्ट असून ५१६ अर्ज प्राप्त झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात ७ हजार ३०० मिनीकीटच्या उद्दिष्टासाठी ३ हजार ९३४ अर्ज दाखल झाले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात ६ हजार मिनीकीटच्या उद्दिष्टापैकी १ हजार २३३ अर्ज प्राप्त झाले आहेत.

यंदाचे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून साजरे केले जात असल्याने या योजनेत महिला शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ दिला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने केले आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/tur-moong-mini-kit-application-pune-division-rat16

माहिती शेअर करा