राज्यातील भोगवटादार वर्ग दोन, तसेच इतर विशेष भूधारणा प्रकारातील अंदाजे तीन लाख शेतकरी तांत्रिक व प्रशासकीय त्रुटींमुळे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. परिणामी, या शेतकऱ्यांना कर्जमाफीसह पीकविमा आणि विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
महसूल विभागातील या तांत्रिक अडचणीची माहिती नसल्याने शेतकरी ‘फार्मर आयडी’साठी कृषी आयुक्तालयाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. ही समस्या महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मांडण्यात आली असून, त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी जमाबंदी आयुक्तालयाकडे सोपविण्यात आली आहे.
‘फार्मर आयडी’ नसल्यामुळे विशेष भूधारणा गटातील शेतकऱ्यांना पीकविमा आणि इतर कृषी योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे येत आहेत. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ या शेतकऱ्यांना कसा द्यायचा, हा प्रश्नही सहकार विभागासमोर निर्माण झाला आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/maharashtra-farmer-id-three-lakh-farmers-excluded-abhi47