राज्यातील २७ जिल्ह्यांत १० फळपिकांच्या मृग बहरासाठी फळपीक विमा योजना तीन कंपन्यांमार्फत लागू करण्यात आली आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२६-२७ करिता राष्ट्रीय विमा पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ही योजना १० फळपिकांसाठी आणि २७ जिल्ह्यांसाठी असणार आहे.
या योजनेतील शेतकरी सहभाग ऐच्छिक असून, कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबतचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बँकेला सादर करणे आवश्यक आहे. यामुळे बँक शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. जे शेतकरी घोषणापत्र देणार नाही त्यांच्या कर्जखात्यातून वीमा हप्ता कपात केली जाणार आहे. या योजनेत नोंदणीसाठी ई-सेवा केंद्र, बॅंक आणि वित्तीय संस्थांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच या योजनेत सहभागासाठी कमीत कमी कोकणासाठी १० गुंठे आणि उर्वरित क्षेत्रासाठी २० गुंठे, तर जास्तीत जास्त ४ हेक्टरची मर्यादा घालण्यात आली आहे. तसेच भाडेपट्ट्याने शेतकरी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नोंदणीकृत भाडेकरार सक्तीचा केलेला आहे.
नोंदणीचे आवाहन
अर्ज भरण्यासाठी संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू, डाळिंब, लिंबू, द्राक्ष आणि हळद या पिकांसाठी १४ जुलै, सीताफळ अंजीर पिकासाठी ३१ जुलै ही अंतिम दिनांक असणार आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी https://pmfby.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/maharashtra-mrig-bahar-fruit-crop-insurance-scheme-rat16