खरीप हंगामातील पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र पीकविम्यासाठी आवश्यक असलेली पीक पाहणीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे पीकविमा योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झाली असून, अनेक भागांत पिकांची उगवण आणि वाढ सुरू झाली आहे. पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद आणि पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे. गतवर्षीपर्यंत पीक पाहणी ऑनलाइन ॲपद्वारे शेतकऱ्यांनाच करावी लागत होती. मात्र मोबाइल हाताळताना येणाऱ्या अडचणी आणि नेटवर्कच्या समस्येमुळे यंदापासून ही प्रक्रिया महसूल विभागाकडे सोपविण्यात आली आहे. १५ जुलैपासून पीक पाहणीला सुरुवात होणार होती. मात्र विमा भरण्याची अंतिम मुदत जवळ आली असतानाही पीक पाहणीची प्रक्रिया सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

गत दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. पुढील २४ तासांत जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अशा परिस्थितीत तग धरलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास पीक पाहणी न होता विमा कंपनी ते नुकसान ग्राह्य धरेल का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/kharif-crop-inspection-delay-maharashtra-updates-aak11

माहिती शेअर करा