दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिन्याला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी राज्य शासनाने ”स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार (स्मार्ट)” योजना सुरू केली आहे.केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त अनुदानामुळे बीपीएल लाभार्थ्यांना अवघ्या २,५०० रुपयांत १ किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारता येणार असून, पात्र नागरिकांनी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांनी केले आहे.
अकोला परिमंडळातील ४ लाख ७२ हजार ६४९ ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात १,३५,६७६, बुलडाणा जिल्ह्यात २,३६,४१९ आणि वाशीम जिल्ह्यात १,००,५५४ ग्राहकांचा समावेश आहे. सन २०२६-२७ मध्ये परिमंडळातील २०,२४६ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. १ किलोवॅट सौर प्रकल्पासाठी सुमारे ५० हजार रुपये खर्च येतो.
केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत ३० हजार रुपयांचे अनुदान मिळते. त्यावर राज्य शासनाकडून बीपीएल लाभार्थ्यांना १७,५०० रुपयांचे अतिरिक्त अनुदान मिळणार असल्याने त्यांना केवळ २,५०० रुपये भरावे लागतील. अनुसूचित जाती-जमातींसाठी १५ हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान असल्याने त्यांचा हिस्सा ५ हजार रुपये, तर इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० हजार रुपये राहणार आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/maharashtra-smart-rooftop-solar-scheme-bpl-households-rat16