शेतीतील प्रयोग, शिक्षण आणि संशोधनासाठी ओळखल्या जाणाऱ्या बारामतीचा आवाज आता थेट संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर घुमणार आहे. बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित संशोधनाची दखल संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) घेतली असून, इटलीतील रोम येथे होणाऱ्या जागतिक परिषदेसाठी या संशोधन प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे.

रोम येथे एक ते तीन जुलै दरम्यान होणाऱ्या ‘स्मार्ट फार्मिंग : शाश्वत कृषी-अन्न प्रणालींसाठी डेटा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील कृषितज्ज्ञ, संशोधक आणि धोरणकर्ते सहभागी होणार आहेत. या परिषदेत बारामतीच्या संशोधनाचा अनुभव जगासमोर मांडला जाणार आहे.

हे संशोधन केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतातील अडचणी सोडविण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता, पीक व्यवस्थापन आणि उत्पादनवाढ यांसारख्या आव्हानांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने उपाय शोधण्याचे काम ट्रस्टने केले आहे.परिषदेसाठी ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे आणि प्रकल्प समन्वयक डॉ. योगेश फाटके यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पवार यांच्या पुढाकारातून ट्रस्टने मागील चार वर्षांपासून ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या सहकार्याने कृषी क्षेत्रातील ‘एआय’च्या वापरावर व्यापक संशोधन केले आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/baramati-ai-agriculture-project-selected-un-conference-rome-rat16

माहिती शेअर करा