शेतकरी कर्जमाफीत निकषांची मारलेली पाचर आणि ३० जूनच्या हुकलेल्या डेडलाइनमुळे खरिपाचा खोळंबा झाला आहे. खाते थकीत असल्याने पीककर्ज वाटपाचे प्रमाण केवळ १५ ते २० टक्के असल्याचे बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.सरकारने कर्जमाफीचे तपशील दिलेले नसल्यामुळे नेमक्या किती शेतकऱ्यांना लाभ होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण सरकारने पुरवणी मागण्यांत कर्जमाफीसाठी तरतूद केलेली रक्कम आणि पात्रतेच्या निकषांत बसणाऱ्या शेतकऱ्यांची अंदाजे संख्या लक्षात घेता दोन लाखांपर्यंत केवळ ५ लाख ७० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो किंवा कमी कर्ज असलेल्या जवळपास १० ते १५ लाख शेतकऱ्यांचीच खाती नील होऊ शकतात, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
गेल्या वर्षी खरिपात शेतकऱ्यांच्या जवळपास ९५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. हाती आलेल्या सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसह रब्बीतील हरभऱ्यालाही कमी भाव मिळाला होता. खरीप तर शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचा ठरला होता.त्यामुळे शेतकरी नेत्यांनी एकत्रित येऊन निवडणुकीच्या वेळी सरकारने दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने ३० जूनपूर्वी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने दोन जून रोजी दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. तर नियमित कर्जदारांना आणि २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्ज भरल्यास ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर केले. तसेच दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समझोता (ओटीएस) योजना आणली.
https://agrowon.esakal.com/agro-special/maharashtra-farm-loan-waiver-crop-loan-delay-kharif-rat16