शेतामध्ये इंटरनेट नेटवर्कची समस्या आणि तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना स्वतः ई- पीक पाहणी अॅपद्वारे शेतातील पिकांची नोंद करताना अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारच्या डिजीटल क्रॉप सर्व्हे या प्रणालीच्या अनुषंगाने पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता हंगामाच्या पहिल्या दिवसापासूनच पीक पाहणी सहायकांमार्फत करण्यात येईल. त्यासाठी कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, कॉमन सर्व्हिस सेंटर चालक यांची सहायक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने डिजीटल अॅग्रीकल्चर मिशन (Digital Agriculture Mission) अंतर्गत अॅग्रीस्टॅक (AgriStack) चा भाग म्हणून डिजीटल क्रॉप सर्व्हे (Digital Crop Survey) ही देशव्यापी एकसमान पीक पाहणी प्रणाली विकसित केली आहे. तसेच सर्व राज्यांमध्ये एकसमान तांत्रिक मानके व कार्यपद्धतीनुसार पीक पाहणी राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने राज्यातील ई-पीक पाहणी प्रणाली अधिक पारदर्शक व केंद्राच्या प्रणालीशी सुसंगत करण्यासाठी राज्यस्तरीय पीक पाहणी समिती गठित करण्यात आली होती. सदर समितीच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाच्या डीसीएस एमएच मोबाईल अॅपची राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्यातील १० गावाची अशा एकूण ३४० गावांची निवड करून प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यात आली.