‘सिंधुरत्न योजना २.०’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘स्मार्ट शेती’साठीचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये क्लस्टर पद्धतीने हा प्रकल्प राबविला जाणार असून, पहिल्या टप्प्यात २०० आंबा आणि २०० काजू उत्पादक, अशा एकूण ४०० शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

बदलत्या हवामानाचा वाढता परिणाम आंबा आणि काजू पिकांवर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पिकांचे व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत स्थानिक हवामानाचा अचूक डेटा उपलब्ध व्हावा यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जाणार आहेत. तसेच जमिनीतील ओलावा, तापमान आणि अन्नद्रव्यांचे प्रमाण मोजून सिंचन व अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मराठी भाषेत थेट मोबाइलवर सल्ला दिला जाणार आहे.

उपग्रह प्रतिमा (सॅटेलाइट इमेजेस) वापरून पिकांची वाढ, ताण आणि संभाव्य कीड-रोगांचा प्रादुर्भाव याबाबत आगाऊ सूचना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर, डोंगराळ भाग आणि उंच झाडांवर प्रभावी औषध फवारणी, तसेच झाडांचे डिजिटल मॅपिंग करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/ai-smart-farming-project-mango-cashew-maharashtra-rat16

माहिती शेअर करा