कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात पावसाच्या हलक्या ते जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. आज (ता. २०) राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या श्री गंगानगरपासून रोहतक, हरदोई, वाराणसी, रांची, सागर बेटे ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत १.५ किलोमीटर उंचीपर्यंत सक्रिय आहे. उत्तर झारखंड आणि बिहार परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीर उंचीपर्यंत, नैर्ऋत्य मध्य प्रदेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, तसेच उत्तर आंध्र प्रदेशची किनारपट्टी व दक्षिण छत्तीसगड परिसरावर ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर बिहारपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे द्रोणीय स्थिती तयार झाली आहे.

रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मालेगाव येथे राज्यातील नीचांकी १०.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात पावसाने हजेरी लावल्याने, तसेच ढगाळ हवामानामुळे तापमानात घट झाली आहे. कमाल तापमानाचा पारा ३० ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे. घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे राज्यातील सर्वाधिक १८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

https://agrowon.esakal.com/weather-news/satara-pune-ghat-heavy-rain-forecast-rat16

माहिती शेअर करा