पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत खरिपातील मृगबहार २०२६-२७ हंगामासाठी पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ६६ शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदविला असून, सुमारे ६४९ हेक्टर क्षेत्र विम्याखाली आले आहे. इंदापूर तालुका वगळता इतर तालुक्यांतून शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष आणि अंजीर या सात फळपिकांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. या सात पिकांपैकी डाळिंब, द्राक्षे आणि अंजीर ही जिल्ह्यातील प्रमुख नगदी फळपिके आहेत.नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहावे, सुधारित शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळावे आणि कृषी पतपुरवठ्यात सातत्य राहावे, या उद्देशाने योजना राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड ही कंपनी योजना राबवत आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, जमीनधारणा उतारा, डिजिटल पीक सर्वेक्षणातील नोंद, फळबागेचे छायाचित्र तसेच भाडेपट्ट्यावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी करारनामा आणि संमतीपत्र आवश्यक आहे. जून महिन्यात पावसाअभावी शेतीची कामे संथ झाली होती.मात्र, जुलैमध्ये पावसाने चांगली हजेरी लावल्याने पेरण्यांना वेग आला आहे. त्याचाच परिणाम म्हणून फळपीक विमा योजनेतही समाधानकारक प्रतिसाद मिळत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/pune-crop-insurance-649-hectares-covered-rat16

माहिती शेअर करा