मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अक्षय तृतीयेच्या बाजारासाठी आंब्याची आवक वाढल्याचे चित्र आहे. यंदा मागणीही टिकून असल्याने दरही स्थिर आहेत. विविध प्रकारचे आंबे बाजारात दाखल झाले आहेत. आमरसासाठी मागणी असल्याने खरेदीसाठी ग्राहकांची नाशिक शहराच्या विविध भागांतील बाजारांत गर्दी दिसून आली.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठ रोडवरील फळबाजार आवारात कोकणसह, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेशातून आंब्याची आवक झाली. मागील वर्षी आवक कमी असल्याने दरात सुधारणा दिसून आली होती; मात्र यंदा आवक वाढल्याने मागणीमुळे दर स्थिर आहेत. गोड व आकर्षक आंब्यांना ग्राहकांकडून विशेष मागणी आहे.
अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिलपासून आंब्याची आवक टप्प्याटप्प्याने वाढली आहे. गेल्या चार दिवसांत शनिवारी (ता. २६) ६७१, रविवारी (ता. २७) ७०९, सोमवारी (ता. २८) ६४५ क्विंटल आवक झाली. त्यामध्ये हापूस आंब्याला मागणी असल्याने दर सर्वाधिक होते.
बाजार समितीत आंबा महोत्सव
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार बाजार आवारात तीनदिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. येथे आंबा घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली. येथे जुनागढ केशर, रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, बंगलोर लालबाग, विजयवाडा बदाम, आम्रपाली गुजरात, हैदराबाद मलिका अशा वाणांचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध होते. यामध्ये कोकणच्या हापूस आंब्यासह केसर आंब्याला ग्राहकांकडून मागणी असल्याचे दिसून आले.