अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (ता. २) भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहा वाजता भारतासोबतच्या व्यापार कराराची घोषणा समाजमाध्यमावर केली. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली आणि अमेरिकेतील वस्तू आयातीला सवलती दिल्यामुळे भारतावरील ५० टक्के आयात शुल्क १८ टक्क्यांपर्यंत कमी केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारताने अमेरिकेच्या वस्तूंची खरेदी वाढविण्याचे मान्य केले आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या एपीडा च्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२५ या चार महिन्यांत महाराष्ट्रातून अमेरिकेला ४१ हजार १२३ टन कृषी व प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने निर्यात झाली असून त्याची किंमत ७६२ कोटी रुपये इतकी आहे. याच कालावधीत २०२४-२५ मध्ये राज्यातून ५६ हजार ०६२ टन माल निर्यात झाला होता, ज्याची किंमत १ हजार १०८ कोटी रुपये होती.ही घसरण अमेरिकेने वाढवलेल्या आयात शुल्काशी जोडली जात आहे. अमेरिकेने १ ऑगस्ट २०२५ पासून भारतीय वस्तूंवर २५ टक्के आयात शुल्क लावले होते, तर २७ ऑगस्टपासून ते वाढवून ५० टक्के करण्यात आले. या निर्णयाचा थेट फटका महाराष्ट्रातील निर्यातदारांना बसला आहे.