भारताने अमेरिकेच्या शेतीमालासाठी बाजारपेठ खुली केल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. भारत सरकारकडून मात्र याविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे कोणत्या शेतीमालाची आयात होणार, किती आणि कधीपर्यंत होणार याची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. तर विरोधी पक्षांनी सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (ता. २) भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहा वाजता भारतासोबतच्या व्यापार कराराची घोषणा समाजमाध्यमावर केली. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली आणि अमेरिकेतील वस्तू आयातीला सवलती दिल्यामुळे भारतावरील ५० टक्के आयात शुल्क १८ टक्क्यांपर्यंत कमी केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारताने अमेरिकेच्या वस्तूंची खरेदी वाढविण्याचे मान्य केले आहे.
भारत अमेरिकेच्या ऊर्जा, कोळसा, तंत्रज्ञान, शेतीमाल आणि इतर उत्पादनांची ५० हजार कोटी डाॅलरपर्यंत खरेदी वाढविणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारताने अमेरिकी वस्तूंच्या आयातीवरील शुल्क शून्य केल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. भारताकडून मात्र याविषयी अधिकृत तपशील मंगळवारी (ता. ३) सायंकाळपर्यंत देण्यात आले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करून या कराराचे स्वागत केले आहे. करारातील तपशील उघड झालेले नसताना सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने मंगळवारी पंतप्रधानांचा कराराराची ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.