जुलै महिन्याच्या अखेरीस नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार पुनरागमन केले असून पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी (ता. २२) सकाळी १०.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. घाटमाथा व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला.

जिल्ह्यात सरासरी ३२.६ मिमी पावसाची नोंद झाली. जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात २८१.९ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीच्या ७१.६ टक्के आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा मंडळात १९८.५ मिमी आणि हरसूल येथे १५८.५ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच त्र्यंबकेश्वर येथे १२० मिमी आणि वेळुंजे येथे १०८ मिमी पाऊस झाला.

सुरगाणा तालुक्यात २४ तासांत सरासरी १२०.७ मिमी पाऊस झाला. उंबरठाण आणि खोकरी येथे प्रत्येकी १३३.५ मिमी, सुरगाणा १२०.३ मिमी, बोरगाव ११७ मिमी आणि मनखेड ११३ मिमी पावसाची नोंद झाली. पेठ तालुक्यात सरासरी ८०.३ मिमी पाऊस झाला. जोगमोडी येथे ९४.८ मिमी, तर कोहोर आणि करंजाळी येथे प्रत्येकी ७५.५ मिमी पावसाची नोंद झाली.

https://agrowon.esakal.com/agro-special/heavy-rain-returns-across-nashik-district

माहिती शेअर करा