पुणे जिल्ह्यात पावसाने पश्चिम पट्ट्यात सोमवारी (ता. ६) जोरदार हजेरी लावल्याने भात लागवडीला वेग आला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाण्याची आवक वाढली आहे. मुळशी तालुक्यातील आंबवणे येथे सर्वाधिक २३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी (ता. ७) देखील जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस सुरूच होता.

हवेली, मावळ, वेल्हा, भोर, खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि पुरंदर तालुक्यांतील अनेक महसूल मंडलांत समाधानकारक पाऊस झाला. तर पूर्वेकडील बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यांच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम सरी पडल्याने खरीप पिकांसाठी आणखी पावसाची गरज कायम आहे.

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील मुळशी, मावळ, वेल्हा आणि भोर तालुक्यांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली असून डोंगराळ भागातील ओढे-नाले प्रवाहित झाले आहेत. या पावसामुळे भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे. हवेली तालुक्यात पुणे वेधशाळा, केशवनगर, कोथरूड, खडकवासला, खेड, भोसरी, चिंचवड, कळस आणि हडपसर या मंडलांत चांगल्या पावसाची नोंद झाली. मुळशी तालुक्यात पौड, घोटावडे, थेरगाव, माले, मुठे, पिरंगूट, कासारआंबोली, सावरगाव, कोळवण, माण, पोमगाव आणि आंबवणे मंडळांत पावसाने दमदार हजेरी लावली.

https://agrowon.esakal.com/agro-special/heavy-rain-maval-mulshi-haveli-pune-rat16

माहिती शेअर करा