गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली केळीच्या दरातील घसरण आता अधिक तीव्र झाली आहे. सध्या बाजारात केळीचा दर या भागात केवळ १५० ते ३०० रुपयांदरम्यान पोहोचला असून, शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी व्यापाऱ्यांकडे विनवणी करावी लागण्याची वेळ आली आहे. दरम्यान, थंडीचा जोर वाढल्याने ग्राहकांची मागणी घटली असून त्याचा थेट परिणाम केळीच्या दरावर झाल्याचा दावा खरेदीदार करीत आहेत.
मागील दोन-तीन हंगामात केळीला चांगले भाव मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी या पिकाच्या लागवडीला पसंती दिली. नियमित उत्पादकांसोबतच नवीन शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर लागवड वाढवली. परिणामी हजारो एकरांमध्ये केळीचे पीक झाले. यामुळे बाजारात पुरवठा वाढला. दरम्यान, गेल्या काळात उत्तरेकडील राज्यांतील पूरस्थितीमुळे वाहतूक आणि निर्यातीवर परिणाम झाला होता. तेव्हापासून केळीचे दर सावरण्याऐवजी सतत खालीच जात आहेत. सध्या केळीचा कमाल दर ३०० रुपये, तर किमान १५० रुपये इतका असून यातून उत्पादन खर्चदेखील वसूल होत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.