यंदाच्या खरीप हंगामासाठी ३५ टक्के कर्जवाटप करण्यात आले असून, ४७ लाख ३५ हजारांपैकी १८ लाख ६ हजार शेतकऱ्यांना कर्जवाटप केले आहे. सार्वजनिक, ग्रामीण, लघुवित्त बँकांनी नेहमीप्रमाणे संथगतीने कर्जवाटप सुरू केले असून, जिल्हा बँकांचे कर्जवाटप वेगाने सुरू आहे.
मागील १५ दिवसांत कर्जवाटपात फारशी प्रगती झालेली नाही. अवेळी आलेल्या पावसामुळे राज्यातील पेरण्या लांबल्या आहेत, परिणामी कर्जवाटपही संथगतीने सुरू आहे.राज्यात २० जूनपर्यंत २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. कृषी विभागाच्या कोकण विभागात ४ टक्के, नाशिक विभागात २५, कोल्हापूर विभागात १८, छत्रपती संभाजीनगर विभागात २९ टक्के, लातूर विभागात २५ टक्के, अमरावती विभागात १३, तर सर्वांत कमी नागपूर विभागात तीन टक्के पेरण्या झाल्या आहेत. कपाशीची केवळ २३ टक्के पेरणी झाली असून सोयाबीन २० टक्के पेरणी झाली आहे.
भाताची केवळ ३ टक्के पेरणी झाली आहे. खरिपाच्या ज्वारीची तीन टक्के पेरणी झाली आहे. २०२५-२६ साठी ४४ हजार, ७६ लाख कोटींचा पतआराखडा सादर करण्यात आला. यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी ८० हजार ४०० कोटींचा पीक कर्जवाटपाचा लक्षांक निश्चित केला आहे. मागील वर्षी हाच लक्षांक ७४ हजार ७८१ कोटी होता. त्यापैकी ६५ हजार ८९९ कोटी म्हणजेच ८८ टक्के कर्जवाटप केले होते. कृषी क्षेत्रासाठीच्या मुदत कर्जाचा लक्षांक एक लाख २० हजार कोटी निश्चित केला आहे.
खरीप हंगामासाठी कर्ज वाटपासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकांना २५ हजार ८०३ कोटी तर सार्वजनिक आणि ग्रामीण बँकांसाठी ३९ हजार ८६५ तर खासगी, लघुवित्त बँकांसाठी १० हजार ४५२ कोटींचा लक्षांक आहे. यापैकी जिल्हा बँकांनी ६१ टक्के म्हणजे १८ हजार ९६७ कोटी रुपयांचे १३ लाख ६० हजार शेतकऱ्यांना वाटप केले आहे. सार्वजनिक बँकांनी केवळ २३ टक्के म्हणजे २८ हजार १७१ कोटींपैकी केवळ ६ हजार ५०५ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. खासगी, लघुवित्त बँकांनी १३ टक्के म्हणजे ६ हजार ९५६ कोटींपैकी ८७४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/35-percent-loan-allocation-for-kharif-rat16