देशातील हळद पिकाला पावसाचा फारसा फटका बसला नसून १० टक्के नुकसान झाले आहे. यंदा हळदीच्या क्षेत्रात ३० टक्क्यांनी वाढ झाली असून ९५ लाख ते १ कोटी पोत्यांचे (एक पोते ५० किलोचे) उत्पादन होईल, असा प्राथमिक अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

देशात गेल्या वर्षी हळदीला चांगले दर मिळाले, त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी हळद लागवडीला पसंती दिली. मात्र, देशातील हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात मे, जून महिन्यांपासून पाऊस सुरू झाला. परंतु या पावसाचा हळद लागवडीवर परिणाम झाला नाही. अशा परिस्थितीतही जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हळदीची लागवड झाली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू या राज्यांत हळद पिकाला पोषक वातावरण होते. त्याबरोबर पाऊसही चांगला झाला आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू या भागांत दीडपट लागवड झाली आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४० टक्क्यांनी लागवड वाढली असल्याचा अंदाज हळद व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/turmeric-production-is-expected-to-increase-in-the-country-rat16

माहिती शेअर करा