आंबिया बहारासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत असून यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. या योजनेत आंबा, संत्रा, डाळिंब व पपई या अधिसूचित फळपिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. हवामानातील अनिश्चितता, पाऊस, तापमान, आर्द्रता, गारपीट व वारा यांसारख्या जोखमींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे हा योजनेचा उद्देश आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार दोन्ही शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.
खातेदार शेतकरी तसेच कुळाने/भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी पात्र आहेत. केंद्र शासनाकडून ३० टक्क्यांपर्यंत हप्ता, अतिरिक्त ५ टक्के राज्य शासनाने स्वीकारलेला आहे. उर्वरित हप्ता राज्य शासन व शेतकऱ्यांनी प्रत्येकी ५० : ५० टक्के प्रमाणे भरणे आवश्यक. प्रति शेतकरी किमान २० गुंठे (०.२० हे.) व जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादा आहे. सहभागासाठी ई-पीक पाहणी व अॅग्रिस्टॅक फार्मर आयडी बंधनकारक असून केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण लागू आहे.