महाराष्ट्रातील शेतकरी हा सरकारचा महत्त्वाचा विषय असतो. त्यामुळे आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात विचार करत आहोत. त्या अनुषंगाने आम्ही नियोजन केले आहे. कर्जमाफी निश्चितपणे केली जाईल. त्यासाठी आमची समिती काम करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. २) दिली.
मुंबईतील प्रभादेवी येथील ‘सकाळ’च्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य संपादक राहुल गडपाले यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत कर्जमाफी, वन्यप्राणी आणि मानव संघर्ष या अनुषंगाने त्यांनी मते व्यक्त केली.
श्री. फडणवीस म्हणाले, की कर्जमाफीचे नियम, निकष काय असले पाहिजेत, त्यावर सरकारची समिती काम करत आहे. आजवरच्या कर्जमाफीमध्ये अंतिमतः शेतकऱ्याला किती फायदा झाला माहिती नाही. बँकांना फायदा जास्त होतो असे लक्षात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा कसा देता येईल, त्याला त्या दुष्टचक्रातून काही काळ बाहेर कसे काढता येईल याचा आपल्याला विचार करावा लागेल.
त्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने कर्जमाफी करायची याच्या संदर्भातली समिती काम करते आहे. आपण २०१७ ला कर्जमाफी केली. २०२० ला कर्जमाफी केली. इतक्या लवकर कर्जमाफी करायची वेळ येते तेव्हा व्यवस्था कुठेतरी चुकते आहे. या व्यवस्थेला योग्य पद्धतीने कसे वापरता येईल हा आमचा प्रयत्न आहे. ज्यांना आवश्यक आहे त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे अशा पद्धतीने त्याची तयारी करत आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/government-planning-loan-waiver-fadnavis-rat16