सातारा जिल्ह्यात १३ मे पासून सुरू झालेल्या पावसामुळे आले पिकाची लागवड रखडली होती. मात्र पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यात दाटक्या घातीवर आले लागवडीस प्रारंभ झाला आहे. दरात मोठ्या प्रमाणात झालेली घसरण व झालेला अतिरिक्त पाऊस यामुळे या हंगामात आले पिकाच्या दरात घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात नगदी पिकापैकी आले हे प्रमुख पीक आहे. जिल्ह्यात अडीच ते तीन हजार हेक्टरवर आले पिकाचे सरासरी क्षेत्र आहे. बाजारपेठेत सातारी आल्याची स्वंतत्र ओळख आहे. गेल्या चार वर्षांत आले पिकाच्या दराने विक्रम केले होते.
मात्र यावर्षी आले पिकाच्या दराने नीचांक गाठला आहे. दरातील घसरणीमुळे आले पीक खरेदीचा बोजबारा उडाला आहे. व्यापाऱ्यांकडून खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांत चिंता निर्माण झाली आहे. दराच्या संकटात आता अतिपवासाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. अक्षय तृतीया किंवा मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून (तापमान व पाणी परिस्थिती) पाहून आले लागवड सुरू होते. मात्र याच काळात मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. मेच्या अखेरीस सलग सात दिवस मुसळधार पाऊस झाल्याने शेतात पाणी पाणी झाले होते. याचा परिणाम आले लागवडीवर झाला आहे. सुरुवातीचा लागवडी काळ गेला असून सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची दाटक्या घातीवर आले लागवड सुरू केली आहे.
पावसाचे प्रमाण जास्त असल्याने अद्याप अपेक्षित घात आलेली नाही. तसेच अनेक शेतकऱ्यांची मशागतीची कामे झालेली नाहीत. यामुळे जूनच्या अखेरपर्यंत लागवड सुरू राहण्याचा अंदाज आहे. किमान उद्याप चार ते पाच दिवस पाऊस न झाल्यास लागवडीस गती येणार आहे. मात्र पुढील चार ते पाच दिवसांत मॉन्सून सक्रिय झाल्यास आले लागवड रखडणार आहे. दरामुळे नाराज असलेले शेतकरी त्यात अति पावसामुळे आले पिकाबाबत निराशा दिसून येत आहे. दर कमी जास्त झाले पीक टिकवण्याच्या दृष्टीने, बियाण्यासाठी कमी का होईना शेतकरी आले लागवड करतात. बियाणे कमी खरेदी झाल्याने या हंगामात आले पिकांच्या क्षेत्रात किमान ३० टक्के घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.