फेब्रुवारी २०२६ या एकाच महिन्यात देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीत ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे ‘ट्रॅक्टर अँड मेकनायझेशन ऑफ इंडिया’च्या अहवालातून स्पष्ट झाले होते. ट्रॅक्टर विक्रीतील या वाढीस मागील मॉन्सूनचा (जून ते सप्टेंबर २०२५) दमदार पाऊस तसेच जीएसटी कपातीमुळे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदीला पसंती दिली असल्याचे हा अहवाल सांगतो. मात्र ‘क्रिसिल रेटिंग’सह इतरही काही संस्थांनी एल निनोच्या परिणामामुळे मार्च २०२६ पासून ट्रॅक्टर खरेदीला थोडा ब्रेक लागेल, असा अंदाज वर्तविला होता.
मात्र देशातील ट्रॅक्टर विक्रीत जुलै २०२६ मध्ये लक्षणीय वाढ (१ लाख ७ हजार ३२९) नोंदविण्यात आली आहे. ही विक्री जुलै २०२५ मधील (८३ हजार ९७०) ट्रॅक्टर विक्रीच्या तुलनेत सुमारे २८ टक्क्यांनी अधिक आहे. केवळ जुलैमध्येच नाही तर चालू आर्थिक वर्षात (२०२६-२७) पहिल्या चार महिन्यांत (एप्रिल ते जुलै) गेल्या वर्षीच्या तुलनेत २३.५६ टक्के ट्रॅक्टर विक्री वाढली आहे. पुढील काही महिन्यांत ट्रॅक्टर विक्रीचा सकारात्मक कल कायम राहील अशी अपेक्षा यातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
देशभरात वाढती मजूरटंचाई, मजुरीचे वाढलेले दर, बैलावरचे कमी झालेले शेतीचे अवलंबित्व, मशागत, पेरणी, काढणी-मळणी अशा कामांसाठी उपलब्ध होत असलेले ट्रॅक्टरचलित औजारे, बॅंकांकडून ट्रॅक्टर खरेदीसाठी होत असलेला पतपुरवठा, यंत्रे-अवजारांना दिले जाणारे अनुदान या सर्वांच्या परिणामस्वरूप देशांतर्गत ट्रॅक्टरचा खप आणि निर्यातही वाढत आहे. ही नक्कीच दिलासादायक बाब म्हणता येईल.
https://agrowon.esakal.com/sampadkiya/high-tractor-loan-interest-rates-farmers-india-rat16