राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहे. आज (ता. १५) पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथा आणि भंडारा, गोंदियात जोरदार पावसाची, तसेच उर्वरित विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. राज्यात हलक्या पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूर, मुजफ्फरनगर, फतेहगड, दाल्तोंगज, तीव्र कमी दाब क्षेत्राचे केंद्र, दिघा ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरपर्यंत सक्रिय होता. मध्य भारत आणि लगतच्या दक्षिण भारतात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांमुळे हवेचे जोड क्षेत्र कायम आहे. राजस्थानपासून गुजरात ते अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तसेच सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे सर्वाधिक १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
https://agrowon.esakal.com/weather-news/vidarbha-rain-thunderstorm-lightning-alert-rat16