राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. आज (ता. ३०) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यासह, कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्यात जोरदार सरींची, तसेच तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानातील श्रीगंगानगरपासून भिवानी, ग्वालेर, सिधी, वादळी प्रणालीच्या केंद्र, पूरी ते मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मध्य भारतात पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे. यातच वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) मध्य भारताकडे सरकत असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.
बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कोकण घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी – अधिक होत आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोर कायम असल्याने सातारा जिल्ह्यातील कोयना नवजा येथे राज्यातील सर्वाधिक ३९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
https://agrowon.esakal.com/weather-news/maharashtra-heavy-rainfall-monsoon-weather-alert-rat16