देशातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीत पुढे चालू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. म्हणजेच ही योजना पुढील ५ वर्षे २०३१ पर्यंत सुरु राहणार आहे. यासाठी पुढील पाच वर्षांसाठी एकूण ३.१५ लाख कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती आज केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘पीएम-किसान’ (PM-Kisan) योजनेच्या मुदतवाढीस मंजुरी देण्यात आली. पीएम किसान ही सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत, पीक हंगामानुसार शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते.

शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा प्रत्येकी २ हजार रुपयांच्या हप्त्यात ही रक्कम मिळते. यामुळे त्यांना प्रत्येक पीक हंगामाच्या सुरुवातीला बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठा खरेदी करण्यास तसेच पेरणीसाठी मदत होते. ही संपूर्ण रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, असे वैष्णव यांनी सांगितले.

ही योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेंतर्गत आतापर्यंत २३ हप्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात ४.४७ लाख कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. २३ व्या हप्त्यापोटी १८,९८४ कोटी रुपये वितरित करण्यात आली. तर याचा लाभ देशातील ९.४९ कोटी शेतकऱ्यांना मिळाला.

https://agrowon.esakal.com/agro-special/pm-kisan-scheme-extended-till-2031-rs-3-15-lakh-crore-cabinet-approval-ddb79

माहिती शेअर करा