चंद्रपूर गोंडपिंपरी तालुक्यातील करंजीसह १३ गावांतील शेतकऱ्यांनी प्रस्तावित एमआयडीसीसाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाला तीव्र विरोध केला आहे. भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक हजार पत्रे पाठविण्यात आली असून, मागणी मान्य न झाल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी एकता संघर्ष कृती समितीने दिला आहे.
राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी राजपत्रात एमआयडीसीसाठी सुमारे १० हजार एकर जमीन अधिग्रहित करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली. मात्र, ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा न घेता आणि शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देता ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
करंजी, आक्सापूर, वडकुली, चेकवडकुली, वढोली, शिरशी देऊळकार, चेकबेरडी, बोरगाव, धानापूर, चेक बोरगाव, चेक पेल्लूर, लिखितवाडा आणि खराडपठ या गावांतील शेतकऱ्यांचा या प्रस्तावाला विरोध आहे. अनेक पिढ्यांपासून शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या जमिनी अधिग्रहित झाल्यास ते भूमिहीन होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यातच पुनर्वसनाचा ठोस आराखडा नसल्याने अस्वस्थता वाढली आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/demand-to-cancel-land-acquisition-notification-protest-aak11