शेतकरी कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची ५० हजार रुपयांवर बोळवणूक करु नये. त्यांना २ लाख रुपयांचा लाभ देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी लावून धरली आहे. नियमित कर्जदारांच्या प्रश्नावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये, असा इशारा किसान सभेने राज्य सरकारला दिला आहे. त्यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन दिली आहे.
या प्रश्नी किसान सभेच्या शिष्टमंडळाने सरकारशी चर्चा केली होती. या चर्चेमध्ये महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला नियमित कर्जदारांना आणि वंचित कर्जदार शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन त्यांनी पूर्ण करावे, अशी मागणी किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
नियमित कर्जदार, ज्यांनी आपले कर्ज काटकसर करुन भरले. ते काही श्रीमंत शेतकरी नाहीत. त्यांनी कर्ज भरले याची शिक्षा त्यांना देता कामा नये. केवळ ५० हजार रुपयांची त्यांची बोळवणूक करणे हे त्यांना शिक्षा दिल्यासारखेच आहे. त्यामुळे त्यांनादेखील २ लाखांपर्यंत दिलासा द्या, ही रास्त मागणी किसान सभेने उचलून धरली आहे.