कमी पावसामुळे देशातील सोयाबीन उत्पादन सुमारे १० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. सोयाबीनची आयातही कमी होणार असून, त्यामुळे देशातील एकूण पुरवठा १३ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. सोयाबीनचे गाळप आणि सोयापेंड उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (यूएसडीए) परराष्ट्र कृषी सेवेने हे सुधारित अंदाज वर्तवले आहेत.
यूएसडीएच्या दिल्ली कार्यालयाने देशातील सोयाबीन उत्पादनाबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात ९ टक्क्यांनी घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
‘एल निनो’च्या प्रभावामुळे मॉन्सूनचे आगमन उशिरा झाले आणि पेरणीच्या काळात पाऊस अनियमित राहिला. त्यामुळे यंदा सोयाबीनची पेरणी उशिरा झाली असून, पावसाचे वितरणही असमान राहिले. जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे क्षेत्र काही प्रमाणात सावरले.