राजस्थानातून मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान होत असतानाच राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. यातच चटका वाढला असून, ऐन पावसाळ्यात उन्हाचा वणवा पेटला आहे. गुरुवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. १८) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे आला असून, सौराष्ट्र परिसरावरील कमी दाब प्रणालीपासून बिकानेर, रोहतक, बरेली, बस्ती, देहरी, रांची, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मराठवाडा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीदरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून मन्नारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.

गुरुवारी (ता. १७) सोलापूरसह चंद्रपूर येथे ३७ अंश सेल्सिअस, अमरावती, अकोला, आणि जेऊर येथे ३६ अंशापेक्षा अधिक तर अहिल्यानगर, ‎परभणी आणि वर्धा येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरी येथे सर्वाधिक ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

https://agrowon.esakal.com/weather-news/rain-break-in-maharashtra-as-heat-intensifies-across-the-state-abhi47

माहिती शेअर करा