जुलै महिन्यातील चांगल्या पावसानंतर ऑगस्टमध्ये राज्यात पावसाने दडी मारली आहे. यातच सप्टेंबर महिन्यातही कमी पावसाचे संकेत असून, देशात ९१ टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भाच्या उत्तर भागात पाऊसमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी सोमवारी (ता. ३१) सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. १९७१ ते २०२० कालावधीत दीर्घकालीन सरासरीनुसार सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी १६७.९ मिलिमीटर पाऊस पडतो. यातच ऑगस्ट महिन्याअखेरपर्यंत देशात सरासरी ६०३.७ मिलिमीटर (उणे १४ टक्के), तर महाराष्ट्रात ७१७.४ मिलिमीटर (उणे १२ टक्के) पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाकडील नोंदींवरून दिसून येत आहे.
https://agrowon.esakal.com/weather-news/maharashtra-monsoon-rainfall-september-forecast-rat16