राज्यात मॉन्सूनच्या पावसाने उसंत घेतली असली, तरी तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत. आज (ता. ३०) पूर्व विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून, नजीबाबाद, हरदोयी, सुलतानपूर, दोल्तोंगज, पुरुलिया, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला होता. ईशान्य उत्तर प्रदेश परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

शनिवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयना (पोफळी) येथे १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

https://agrowon.esakal.com/weather-news/east-vidarbha-marathwada-rain-forecast-rat16

माहिती शेअर करा