सोमवार ते बुधवार (ता. २४ ते २६) या काळात पुणे येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे वार्षिक अधिवेशन पार पडले. या अधिवेशनामध्ये द्राक्ष बागायतदारांसाठी विविध तांत्रिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील माती, पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन व विपणन या विषयावरील चर्चासत्राचे चेअरमन सुनील बोरकर आणि व्हाइस चेअरमन डॉ. आर. जी. सोमकुंवर हे होते. या चर्चासत्रामध्ये डॉ. जगदेव शर्मा आणि डॉ. एस. डी. सावंत यांनी बागायतदारांना मार्गदर्शन केले. त्याचा सविस्तर आढावा…
मातीचे आरोग्य आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना सिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जगदेव शर्मा यांनी सांगितले, की बदलते आणि अनिश्चित हवामान, अवकाळी पाऊस, थंडी व उष्णतेचे ताण या स्थितीमध्ये बागेमध्ये अन्नद्रव्य देण्याचे तंत्रही बदलण्याची गरज आहे. सर्वांसाठी एकच डोस हे तत्त्व आता तितके उपयोगी ठरणार नाही. कारण प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारची माती असून, तिची जलधारण क्षमता, चुनखडीचे प्रमाण आणि मातीची खोली या बाबी वेगवेगळ्या असणार आहेत. या प्रत्येक मातीमध्ये मुळांची वाढण्याची व अन्नद्रव्ये उचलण्याची कार्यक्षमता ही वेगवेगळी असू शकते.
डॉ. शर्मा यांच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे
अतिघट्ट मातीमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी राहते. परिणामी मुळांचा विकास कमी होतो. स्फुरद, पालाश, कॅल्शिअम आणि बोरॉन यांचे शोषण कमी होते. पाणी केवळ तीस मायक्रॉनपेक्षा मोठ्या आकाराच्या छिद्रामधून प्रवास करत असते. चिकणमातीमध्ये एक मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराची छिद्रे असतात. त्यामुळे मातीची चांगल्या प्रकारे मशागत करून ती भुसभुशीत ठेवावी.
https://agrowon.esakal.com/agro-special/grape-nutrient-management-quality-production-rat16