ग्रामीण भागातील पशुपालन व्यवसायाला अधिक बळ देऊन पशुपालकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ अधिक सुलभ केली आहे. योजनेच्या निकषांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करणारे शुद्धीपत्रक सरकारने जारी केले असून, पशुपालकाकडे आधीच गोठा किंवा शेड असल्यास आता त्याला तीन लाख रुपयांपर्यंत मुरघास बंकर उभारण्यासाठी अनुदान मिळू शकणार आहे. शेड आणि मुरघास बंकर दोन्ही उभारायचे असल्यास त्यासाठीही तीन लाख रुपयांची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.
पशुपालकांच्या प्रत्यक्ष अडचणी आणि प्रशासनाकडून प्राप्त प्रस्तावांचा विचार करून योजनेत हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आधीपासून गोठा असलेल्या पशुपालकांना पुन्हा शेड उभारण्याची आवश्यकता राहणार नाही. त्याऐवजी जनावरांसाठी वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेला मुरघास बंकर उभारता येणार आहे. योजनेअंतर्गत दुधाळ गाय-म्हैस पालन प्रकल्पासाठी पूर्वी तीन लाख रुपयांच्या शेड निर्मितीची तरतूद होती. सुधारित निकषांनुसार आता ‘शेड निर्मिती किंवा मुरघास बंकर किंवा दोन्ही’ असा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे स्वतःचा गोठा असलेल्या पशुपालकांना या तरतुदीचा थेट लाभ घेता येणार आहे.