परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होण्यापूर्वी राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. काही ठिकाणी कडक ऊन तर काही भागात ढगाळ वातावरण होत आहे. दीर्घ खंडानंतर मराठवाड्यातील काही भागांत जोरदार अतिवृष्टी झाली. बीड, परभणी आणि हिंगोलीतील काही मंडलांत अतिवृष्टी झाली असून नाशिकच्या सिन्नरमध्येही ४० दिवसांनंतर दमदार पाऊस झाला. मात्र, अनेक भागांत पावसाची उघडीप असून ऊन कायम आहे.

पावसाचे जवळपास साडेतीन महिने लोटले आहे. या कालावधीत कमीअधिक प्रमाणात पाऊस पडला. प्रामुख्याने जुलैमध्ये पावसाचा जोर अधिक होता. तर आॅगस्टमध्ये तुरळक सरी बरसल्या होत्या. त्यानंतर पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला असून झरी मंडलात १२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

बीड जिल्ह्यात परळी आणि अंबाजोगाई तालुक्यांत पावसाचा जोर होता. सिरसाळा, पिंपळगाव गाढे, परळी, घाटनांदूर आणि बर्दापूर मंडलांत अतिवृष्टी झाली. मोहखेड, बनसारोळा, पाटोदा, धारूर, लोखंडी सावरगाव, नागापूर आणि गंगामसला येथेही जोरदार पाऊस झाला. शिरूर कासार, वडवणी आणि गेवराई तालुक्यांत पाऊस झाला नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पिशोर, नाचनवेल, बाबरा, पिरबावडा, लाडसावंगी, चौका आणि फुलंब्री येथे जोरदार पाऊस झाला. पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांत पाऊस झाला नाही.

https://agrowon.esakal.com/agro-special/maharashtra-weather-change-retreating-monsoon-marathwada-rainfall-rat16

माहिती शेअर करा