बेसॉल्ट खडकामध्ये भूजल मुख्यतः अपक्षयित थर, सांधे , भेगा आणि व्हेसिक्युलर भागांमध्ये साठते. त्यामुळे चिकणमातीचा अडथळा पार करून पाणी या भागांपर्यंत पोहोचवणे हे भूजल पुनर्भरणाचे मुख्य उद्दिष्ट असते. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि केंद्रीय भूजल मंडळ यांच्या अभ्यासानुसार, बेसॉल्ट प्रदेशात भूजलाचे संचयन हे हवामानामुळे झिजलेल्या व भेगायुक्त थरांमध्ये अधिक प्रभावीपणे होते.
त्यामुळे भूजल पुनर्भरणासाठी योग्य स्थळांची निवड ही भूवैज्ञानिक आणि जलभूवैज्ञानिक अभ्यासाच्या आधारे करणे आवश्यक आहे. मृदा संधारण व जलसंधारण हे शेती, पर्यावरण व शाश्वत विकासाचा पाया आहे. माती आणि पाणी ही नैसर्गिक संसाधने एकमेकांवर अवलंबून असून भविष्यातील पिढीसाठी त्याचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातील बहुतेक भागात डेक्कन ट्रॅप (बेसॉल्ट) खडक असून प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात त्यावर चिकणमाती आढळते.
चिकणमातीची जलपारगम्यता अत्यंत कमी असल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत सहज मुरत नाही. परिणामी, पृष्ठभागावरील वाहून जाणारे पाणी वाढते आणि भूजल पुनर्भरण कमी होते. भूजलाचा वाढता वापर, अनियंत्रित कूपनलिका खोदकाम, कमी होणारे पर्जन्यमान आणि हवामान बदल यांमुळे अनेक गावांमध्ये भूजल पातळी सतत खालावत आहे. त्यामुळे भूजलाचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने करणे, पिकांच्या पाण्याच्या गरजेनुसार सिंचन करणे, ठिबक व तुषार सिंचनाचा अवलंब करणे आणि पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/groundwater-recharge-basalt-regions