प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ आणखी तीव्र होत असून, उत्तर गोलार्धातील शरद ऋतू आणि २०२६-२७ च्या हिवाळ्यात तो अतितीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक आहे, असे अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या (नोआ) क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) १० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या मासिक आढाव्यात म्हटले आहे.

गेल्या महिनाभरात ‘एल निनो’ अधिक बळकट झाला. पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरात समुद्रपृष्ठाच्या तापमानातील वाढ सरासरीपेक्षा ३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेली आहे, असे आढाव्यात नमूद आहे. ऑगस्टमध्ये निनो ३.४ निर्देशांक १.८ अंश, निनो ३ निर्देशांक २.५ अंश, तर निनो १+२ निर्देशांक ३.४ अंशांवर पोहोचला. निनो ४ निर्देशांक मात्र ०.१ अंशावर घसरला.

समुद्राच्या पृष्ठाखालील तापमानही सरासरीपेक्षा बरेच जास्त राहिले असून, काही खोलीवर ते सरासरीपेक्षा १० अंशांहून अधिक नोंदविले गेल्याचे ‘सीपीसी’ने म्हटले आहे. पश्चिमेकडून पूर्व मध्य प्रशांत महासागरापर्यंत खालच्या थरात पश्चिमी आणि वरच्या थरात पूर्वी वाऱ्यांचे प्रवाह दिसून आले. मध्य ते पूर्व प्रशांत महासागरात ढगनिर्मिती आणि पाऊस वाढला, तर इंडोनेशियाच्या भागात तो सरासरीपेक्षा कमी राहिला. सदर्न ऑसिलेशन निर्देशांकही ऋण राहिल्याचे आढाव्यात म्हटले आहे.

https://agrowon.esakal.com/weather-news/vidarbha-marathwada-heavy-rain-alert-maharashtra-weather-rat16

माहिती शेअर करा