एल निनो’चा इतिहास पाहता सरासरी नोव्हेंबर ते जानेवारी या काळात तीव्रता वाढत असते. परंतु यंदा तीव्रता लवकर वाढायला सुरुवात झाली आहे. जागतिक हवामान संस्थेच्या मते, यंदाचा एल निनो गेल्या ७० वर्षांतील तीव्र असणार आहे. तसेच एल निनो फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहू शकतो. म्हणजेच जगाची भूक भागवणाऱ्या देशांमधील पीक उत्पादनाच्या काळातच एल निनो तीव्र होत आहे.

संयुक्त राष्ट्राचे अध्यक्ष अॅंटीनियो गुटेरस यांच्या मते, जगाने अत्यंत तीव्र हवामान धोक्याच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. एल निनोच्या वाढत्या तीव्रतेबरोबरच जागतिक पातळीवर दुष्काळ, तापमान वाढ, अति पाऊस आणि पूर तसेच वणव्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे एल निनोमुळे बसणारा आर्थिक फटका यंदा मोठा असणार आहे. शिवाय मानवी जीवनावरही परिणाम होणार आहे.

जगाच्या काही भागात दुष्काळ तर काही भागात पूर अशी स्थिती राहणार आहे. यंदा जागतिक शेतीमाल उत्पादनाचा आलेखही बदलणार आहे. एल निनोमुळे आग्नेय आशिया, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील भागात कमी पाऊस आणि दुष्काळी स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. तर पूर्व आफ्रिका, दक्षिण ब्राझील आणि दक्षिण अमेरिकेत जास्त पाऊस आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती जागतिक शेतीमाल उत्पादनासाठी प्रतिकूल असणार आहे.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/el-nino-impact-global-agricultural-commodity-market-rat16

माहिती शेअर करा