केंद्र सरकारने कच्च्या कापसावरील आयात शुल्क काढल्यामुळे सरलेल्या विपणन वर्षात कापूस आयात विक्रमी पातळीवर पोहोचली. आयात आधीच्या वर्षाच्या तुलनेत ६४ टक्क्यांनी, तर सरासरीच्या तुलनेत चारपट वाढून ६४ लाख गाठींवर (१ गाठ = १७० किलो) पोहोचली. मात्र, नव्या हंगामात आयात कमी होऊन ३८ लाख गाठींवर स्थिरावण्याची शक्यता आहे. तसेच कापसाचा वापर चार टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (यूएसडीए) नवी दिल्ली कार्यालयाने व्यक्त केला आहे.

जागतिक कापूस हंगाम ऑगस्ट ते जुलै, तर देशातील कापूस हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबर असा असतो. यूएसडीएच्या दिल्ली कार्यालयाने भारताच्या कापूस क्षेत्राचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यानुसार, ऑगस्ट २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत भारताची कापूस आयात ६४ लाख गाठींवर पोहोचली. आधीच्या वर्षी आयात जवळपास ३९ लाख गाठी होती. नव्या हंगामात, अर्थात २०२६-२७ मध्ये कापसाची आयात ३८ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे.

देशातील कापूस उत्पादकता यंदा वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे उत्पादनातही वाढ होईल. भारतातील कापूस उत्पादन ३१४ लाख गाठींवर पोहोचण्याची शक्यता अहवालात व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने जून ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी कच्च्या कापसाच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली होती.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/india-cotton-imports-forecast-2026-usda-rat16

माहिती शेअर करा