जागतिक सोयाबीन उत्पादन यंदा तीन टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. मात्र सोयाबीन आणि सोयापेंडला असलेल्या वाढत्या मागणीमुळे जागतिक बाजारातील सोयाबीनचे भाव मागील तीन वर्षांतील विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. चीनसह आशियातील इतर देशांकडून अमेरिकेच्या सोयाबीनची खरेदी वाढली असून, त्यामुळे बाजारभावाला आधार मिळत असल्याचे अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) म्हटले आहे.

यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढून ४२२२ लाख टनांवर पोहोचण्याचा अंदाज यूएसडीएने व्यक्त केला आहे. अमेरिकेतील उत्पादन सात टक्क्यांनी वाढण्याची, तर ब्राझीलच्या उत्पादनात तीन टक्क्यांची वाढ होऊन ते विक्रमी १८६० लाख टनांवर पोहोचण्याची शक्यता आहे. अर्जेंटिनातील उत्पादनातही काहीशी वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अमेरिकेसह जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढीचा अंदाज असला, तरी वाढलेल्या मागणीमुळे बाजाराला आधार मिळाला आहे. अमेरिकेत यंदा सोयाबीनचा वापरही वाढण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी अमेरिकेत ७५२ लाख टन सोयाबीनचा वापर झाला होता. यंदा त्यात साडेचार टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज ‘यूएसडीए’ने व्यक्त केला आहे. अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयाबीन तेलाचा वापर वाढत आहे. त्यामुळे सोयाबीनचे गाळपही वाढत आहे. स्थानिक मागणी वाढल्याने ऑगस्टच्या मध्यापासून अमेरिकेच्या बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/global-soybean-market-prices-rise-strong-demand-rat16

माहिती शेअर करा