भारताने रशियाकडून तेल आयात सुरूच ठेवल्यास अमेरिकेकडून पुन्हा एकदा भारतावर अधिक शुल्का (टॅरिफ) सह निर्बंध लादले जाऊ शकतात, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी असलेल्या ‘एअर फोर्स वन’ विमानातून रविवारी (ता. ५) प्रवासादरम्यान पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी यासंदर्भात सूतोवाच केले. ते म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले व्यक्ती आहेत.
पण, त्यांच्या रशियासोबतच्या तेलव्यापाराबाबत मी खूष नाही, हे त्यांना ठाऊक आहे. त्यांनी मला खूष ठेवायला हवे. कारण आमच्याकडे व्यापारशुल्क वाढविण्याचा अधिकार आहे.ट्रम्प यांच्या या विधानानंतर भारताच्या उर्जाविषयक धोरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अर्थात, भारताने पूर्वीच्याच भूमिकेवर ठाम राहात, रशियाकडील तेलखरेदी देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे सांगितले आहे.दरम्यान, काँग्रेसने मोदी यांच्यावर टीका केली आहे. मोदी सरकारने रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे. त्यामुळे भारताची परराष्ट्रनीती आता अमेरिकेच्या दबावाखाली चालते का, असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/trump-warns-india-of-tariff-hike-rat16